नाम फाऊंडेशन कडून शिदेवाडीत नदी खोलीकरणाची पाहणी - शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

नाम फाऊंडेशन कडून शिदेवाडीत नदी खोलीकरणाची पाहणी

- शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

          आष्टी ( प्रतिनिधी ) नाम फाऊन्डेशनने टू टेन ही मोठी पाकलेन मशीन दिल्यानंतर शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. नदी नाल्यात इथले नागरिक करत असलेले श्रमदान, त्यातून झालेली पिचिंग आणि पोट बंधाऱ्यांची उभारणी दिशादर्शक आहे. यातून शेतकरी पाणी समृद्ध होईल, असे नाम चे समन्वयक राजाभाऊ शेळके यांनी म्हंटले आहे. तर शेतकऱ्यांच्या पाठीवर थाप देत त्यांना आणखी महत्वाचे मार्गदर्शन केल्याने जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी नामचे राजाभाऊ शेळके यांचेसह सह शिदेवाडीच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
            आज नामने पाहणीसाठी आल्यानंतर तळपत्या उन्हात दुपारी गावची नदी पायी फिरून पालथी घातली. पूर्वीचे बुजलेले नदी पात्र आणि चांगले तयार बंधारे असतानाही साचलेला गाळ, यामुळे पावसाचे पाणी साठत नव्हते. नाममुळे आता शिदेवाडी पाण्याचं गाव होणार आहे. शेतकऱ्यांच जीवनमान उंचावणार आहे. पाहणीप्रसंगी जमलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
          गावातील तेरा बंधाऱ्यांसह नदी पात्राच काम सध्या शिदेवाडीत चालू आहे. गेल्या वीस दिवसापासून हे काम चालू आहे. नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने आपोआपच जमिनीचा पोत सुधारत आहे. तसेच निघालेला मुरूम शेतजमिनीत जेथे कोठे वगळी पडलेल्या आहेत आणि खड्डे आहेत, तेथे टाकला जात आहे.
             शिदेवाडीकरांनी शेळके यांचा छोटेखानी सत्कार केला. याप्रसंगी शेळके म्हणाले की, या गावासाठी अँड. अजित देशमुख यांनी माझ्याकडे पोकलेन मशीन मागीतली. मशीन मागणारा कोण आहे, हे मी पाहीलं आणि मला वाटलं की, या गावात नक्की चांगले काम होईल. इथल्या पुढाकार घेणाऱ्या मंडळीसह अँड. देशमुख यांनीही येथे विशेष लक्ष दिले आहे. पाणी  साठल्यानंतर शेतकरी आणि परिसरातील गावांना हे गाव निश्चितच दिशा देईल, असेही ते म्हणाले.
           यावेळी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. राजेंद्र जरांगे, ज्ञानेश्वर लेहने, सचिन काकडे, संजय दरेकर, गणेश खंडागळे, राहुल केरूरकर, किशोर भगत, नाना पवार, मनोज देशमुख यांचेसह अन्य यावेळी हजर होते.



Comments